Desh

श्रीनगर येथून जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक

By PCB Author

April 01, 2019

श्रीनगर, दि. १ (पीसीबी) – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक केली आहे. त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. साल २०१५ पासून तो अटक टाळण्यासाठी फरार होता.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा पथके आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे. १४ फेब्रुवारीनंतर सैन्य दलाने जैशच्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारतीय यंत्रणा जैशचे कंबरडे मोडून टाकण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. शक्य त्या सर्व मार्गांनी जैशची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक केल्याने मोठे यश प्राप्त झाले आहे.