‘श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नाही तर हत्या’, केरळच्या पोलीस अधिकाऱ्याचा दावा

0
387

केरळ, दि. १३ (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूला एका वर्षाहून जास्त काळ झाला आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईत बाथ टबमध्ये बुडाल्याने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दुबईत मृतदेह मिळण्यात झालेला उशीर यामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. अनेकांना आता श्रीदेवी यांच्या मृत्यूचा विसर पडला आहे. मात्र केरळचे पोलीस महासंचालक (कारागृह) ऋषीराज सिंह यांनी शंका उपस्थित केली आहे. केरळमधील एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी बुडाल्याने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला नसावा असे म्हटले आहे.

सिंह यांनी फॉरेन्सिक एक्स्पर्ट असणाऱ्या आपल्या एका मित्राशी झालेल्या चर्चेच्या आधारे हा दावा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे सिंह यांचा तो मित्र सध्या जिवंत नाही आहे. यामुळे हा दावा त्यांनी खरेच केला होता का हे कळू शकलेले नाही.

“माझा मित्र आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट मित्र डॉ उमादथन याने मला श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नसून हत्या झाली असावी असे सांगितले होते. कुतुहूल असल्यानेच मी त्याला यासंबंधी विचारले होते”, असे सिंह यांनी लिहिले आहे. “यावेळी त्याने म्हणणे पटवून देण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यानुसार, एक फूट पाण्यात कोणीही बुडू शकत नाही. मग ती व्यक्ती कितीही मद्यपान करत असली तरी. फक्त जर कोणी त्या व्यक्तीचे दोन्ही पाय पकडले आणि तोंड पकडून ठेवले तरच बुडू शकतो”, असेही सिंह यांनी सांगितले आहे.