“श्रीगणेशाचे आशीर्वाद मनोकामना पूर्ण करतात!” – मंदारमहाराज देव

0
468

पिंपरी, दि. 11(पीसीबी) “श्रीगणेशाचे आशीर्वाद मनोकामना पूर्ण करतात!” अशा आशीर्वादपर शुभेच्छा चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य मंदारमहाराज देव यांनी चिंचवड येथे श्री मंगलमूर्तीवाडाच्या प्रांगणात व्यक्त केल्या. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शब्दधन काव्यमंच आणि संवेदना प्रकाशनाच्या वतीने सुभाष चव्हाण लिखित ‘श्री अष्टविनायक दर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन मंदारमहाराज देव यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी आपल्या मनोगतातून, “साहित्य हे समाजहित साधणारे आणि मानवी मनाला आनंदप्रदान करणारे असते!” असे विचार मांडले. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांनी, “गणेशभक्ती, गणेशपूजन, गणेशकथा वाचन, गणपती अथर्वशीर्ष पठण या गोष्टी विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी ऊर्जादायी आहेत!” असे मत व्यक्त केले. सुभाष चव्हाण यांच्या स्नुषा स्नेहल चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून पुस्तकलेखनातील लेखकाच्या भावावस्थेचा उत्कट शब्दांत आढावा घेतला; तर सुभाष चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. नितीन हिरवे यांनी प्रास्ताविक केले.

श्रीकांत चौगुले यांनी साहित्यिकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षानियमांची अंमलबजावणी करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वैशाली मंदार देव, अशोक गोरे, शिवाजीराव शिर्के, कैलास भैरट, मनोज मोरे, डॉ. अजित जगताप, दत्तात्रय कुंभार, सुहास घुमरे, चंद्रकांत कुदळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या संयोजनात अतुल भंडारी, सुनंदा चव्हाण, नंदकुमार मुरडे, तानाजी एकोंडे, शरद काणेकर, स्वप्निल चव्हाण यांनी परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले.