श्रमिक ट्रेन मुळे कोरोनाचा प्रसार ?

0
276

नवी दिल्ली , दि. २७ (पीसीबी) – एकीकडे महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयात आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता केरळ सरकारनेही रेल्वे मंत्रालयावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष श्रमिक ट्रेन हाताळण्याच्या पद्धतीवर केरळ सरकारने आक्षेप घेतला आहे. कोणतीही पूर्व माहिती न देता ट्रेन पाठवल्या जात असून यामुळे सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आखलेल्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं केरळ सरकारने म्हटलं आहे. देशात एकीकडे कोरोनाचा वेगाने फैलाव होत असताना केरळ सरकारने मात्र कोरोनाला रोखण्यात यश मिळवलं असून परदेशी प्रसारमाध्यमांनीही दखल घेत कौतुक केलं आहे.
मंगळवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंबधी पत्र लिहिलं. तर दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्री थॉमस यांनी रेल्वे केरळमध्ये कोरोनाचा फैलाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. केरळमध्ये सध्या करोनाचे ८९६ करोना रुग्ण आहेत. यामधील २०० रुग्ण हे लॉकडाउनदरम्यान राज्यात परतलेले आहेत. महाराष्ट्रातून परतलेले ७२ जण करोना पॉझिटिव्ह आढळले असून ७१ जण तामिळनाडू तर ३५ जण कर्नाटकहून परतलेले आहेत.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, “लोक आपल्या घरी परतत आहेत यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. पण कोणतीही माहिती दिली जात नसल्याने करोनाविरोधातील आमच्या लढाईत अडचणी निर्माण होत आहे”. “मुंबईहून केरळला कोणताही माहिती न देता ट्रेन पोहोचली होती. यामुळे आम्ही कोरोना रुग्णांची ओळख पटवण्यासाठी आखलेली यंत्रणा बिघडत आहे. मी हा मुद्दा रेल्वे मंत्र्यांकडे उपस्थित केला. पण यानंतरही अजून एक ट्रेन कोणताही पूर्वकल्पना न देता केरळमध्ये पोहोचली. मी हा मुद्दा पंतप्रधानांकडेही मांडला आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.

दरम्यान अर्थमंत्री थॉमस यांनी ट्विट केलं असून म्हटलं आहे की, “मुंबईहून गेल्या आठवड्यात एक ट्रेन आली. ट्रेन सुरु झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं. अनेक स्थानकांवर थांबलेल्या या ट्रेनमधील प्रवाशांकडे पास नव्हते. महामारीत हा भोंगळ कारभार सुरु आहे. रेल्वेला केरळमध्ये कोरोनाचा फैलाव करायचा आहे. जबाबदारीने वागा, किमान तुमच्या ट्रेनच्या माहिती तरी ठेवा,” असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.