“शेवटी सरकार पडत नाही म्हटल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे”

0
266

ठाणे, दि.२५ (पीसीबी) : नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत एनसीबी आणि समीर वानखेडे यांचे प्रकरण समोर आणले आहे. एकंदरीत हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील, अशी इशारावजा माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ठाणे येथे पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला, मग शेवटी सरकार पडत नाही म्हटल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आर्यन खान प्रकरण हे त्यातीलच एक असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय. आर्यन खान प्रकरण बोगस प्रकरण असल्याचं नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत उघड केले आहे. आज समीर वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र प्रसारीत केले आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत आहे. प्रभाकर साहील याने एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, हे सर्व धक्कादायक आहे. मुंबईतील बॉलिवूड आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावलाय.

दुसरीकडे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. ‘पहचान कौन’ असे म्हणत मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन आणखी खळबळ उडवून दिली आहे. तर ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र शेअर करुन फर्जीवाडयाची पोलखोल केल्याचा दावाही त्यांनी केलाय.

अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हे पत्रकार परिषद घेत समोर आणल्याचं म्हटलंय. आज ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी मिळवल्याचा आरोप केलाय. अजून काही पुरावे समोर आणणार असल्याचंही मलिक यांनी म्हटलंय.

प्रभाकर साईल यांनी एनसीबीच्या छापेमारीची पोलखोल केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

याप्रकरणातील साक्षीदाराचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. या मुलाने मोठं धाडस केलं. त्याने देशावर उपकार केले. मी त्याच्या धाडसाचं कौतुक करतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. आता मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीची स्टोरी बाहेर येईल, असं ते म्हणाले.