Maharashtra

शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युतीसाठी प्रयत्न करू- सुधीर मुनगंटीवार

By PCB Author

September 27, 2018

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्याची भाजपची तयारी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युतीसाठी प्रयत्न करू. आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक बुधवारपासून मुंबईत सुरू झाली आहे.  

या बैठकीनंतर पत्रकारांशी मुनगंटीवार यांनी संवाद साधला. आमची शिवसेनेसोबत पहिल्यापासून युतीचीच भूमिका आहे. भविष्यातही शेवटच्या क्षणापर्यंत युतीच व्हावी, अशी इच्छा आहे. मात्र, आता निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. कार्यसमितीत पदाधिकाऱ्यांनी असेच मत मांडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील कोअर कमिटीच्या बैठकीतही हे मत आणि धोरण ठरवले आहे, असेही मुनगंटीवारांनी  यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जागावाटपाची चर्चा जाहीरपणे होत नाही. युतीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही एकत्र बसू आणि त्यावर चर्चा करू. जागा नाही तर युती होणे महत्त्वाचे आहे. आम्ही वेगळे लढलो तर काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होईल. लोकसभा, विधानसभेसाठी युती होणे आवश्यक आहे. इतर निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय होत असल्याने तेथे वेगळे लढल्यानंतर पुन्हा एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.