शेरवानी घालून हैदराबादहून येणाऱ्यांनी महाराष्ट्रात गडबड करणे आम्हाला मान्य नाही – हुसेन दलवाई

0
541

सोलापूर,दि.१९(पीसीबी) – हैदराबादहून शेरवानी घालून येणारेच महाराष्ट्रात गडबड करतात. हे आम्हाला मान्य नाही, असं मत काँग्रेसचे नेते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना व्यक्त केलं. यावेळी त्यांनी हिंदुत्व, शिवसेना, सावरकर, कुटुंब नियोजन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावरही भाष्य केलं.

“महाराष्ट्रातील मुस्लिमांना सत्तेत सामावून घेणं आवश्यक आहे. जे घडतंय ते चुकीचं आहे. महाराष्ट्रातील मुसलमान हा खऱ्या अर्थानं या मातीतील मुसलमान आहे. येथे असणारा मुस्लीम हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्याची भाषा कधीही करत नाही. कुणीतरी हैदराबादवरून शेरवानी घालून येतो आणि येथे गडबड करतो. हे आम्हाला मान्य नाही. हे कुठे तरी थांबवणं आवश्यक आहे.”असं हुसेन दलवाई म्हणाले आहेत.

शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यामध्ये फरक आहे. शिवसेनेने वेळोवेळी काँग्रेसला मदत केली आहे. आणीबाणीला देखील बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता, असं म्हणत दलवाई यांनी शिवसेनेसोबतच्या युतीचं समर्थन केलं.

दरम्यान, कुटुंब नियोजनाच्या विषयावर बोलताना हुसेन दलवाई म्हणाले, “मोहन भागवत यांना किती मुलं आहेत मला माहिती नाही. देशाने ‘फॅमिली प्लॅनिंग’ स्वीकारलं आहे. अपत्यांची संख्या तीनवरुन दोनवर आणल्यास फरक पडणार नाही. भागवतांनी नुसत्या उठाठेवी करू नये.”