Maharashtra

शेती, दूध, वस्त्रोद्याग कोलमडलाय – राजू शेट्टी

By PCB Author

May 23, 2020

पुणे, दि. २३ (पीसीबी) – कोरोना विषाणूच्या प्रभावाने शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांना सर्वाधिक फटका बसला आहे. शेती, दूध, वस्त्रोद्योग व्यवसाय कोलमोडून पडले आहेत. या उद्योगांच्या उभारणीसाठीचा कार्यक्रम हा महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमांमध्ये समाविष्ट केला जावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीत शेट्टी बोलत होते. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राहुल गांधी, डाव्यांचे नेते सिताराम येच्युरी, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदबंरम, शरद यादव, यांच्यासह पुरोगामी लोकशाही आघाडीच्या २२ पक्षांच्या नेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

शेट्टी म्हणाले, करोनाच्या संकटामुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार देशोधडीला लागला आहे. यांच्यासाठी सर्वांनी मिळून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. केंद्राने २७ किटनाशकांवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांना किटनाशकांची टंचाई भासू लागलेली आहे. यावर त्वरीत उपाययोजना करण्याची गरज आहे. रोटी, कपडा और मकान या तीन मुलभूत गरजा आहेत. या गरजांवरच प्रभाव पडला असल्याने रोटी कपडा आणि मकान या त्रिसूत्रीला उभारी द्यावी, अशी आग्रही मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.