शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

0
260

नवलाखउंब्रे, दि. १५ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे एका शेतातील घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. यात पोलिसांनी 10 लाख 26 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 14) सायंकाळी करण्यात आली.

नवलाख उंब्रे येथील उमाकांत जाधव यांच्या शेतातील घरामध्ये बंदिस्त जागेत काही लोक अवैधरित्या, आर्थिक फायद्यासाठी पैशावर जुगार खेळत आहेत. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सापळा लावून जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

या कारवाईमध्ये 68 हजार 250 रुपये रोख रक्कम, एक लाख 60 हजार 700 रुपयांचे मोबाईल फोन, सात लाख 75 हजारांच्या सात दुचाकी, एक चारचाकी वाहन, 22 हजार 640 रुपयांचे जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 10 लाख 26 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी घर मालक रवि रमाकांत जाधव (वय 40, रा. जाधववाडी, नवलाख उंब्रे ता. मावळ जि. पुणे), राजु सिताराम दरवडे (वय 38, रा. कान्हेवाडी ता. मावळ जि. पुणे) व इतर 16 इसम यांच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188, 269, महाराष्ट्र जुगार अधिनियम 1887 चे कलम 4, 5 साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 51 (ब) महाराष्ट्र कोव्हिड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, संगिता जाधव, राजेश कोकाटे, जालिंदर गारे, सोनाली माने यांनी केली आहे.