शेतातील बांधाच्या वादातून दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

0
388

चऱ्होली, दि. ९ (पीसीबी) – शेतातील बांधाच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी च-होली बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष अरुण तापकीर, अशोक निवृत्ती तापकीर, बाळू निवृत्ती तापकीर या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अन्य दोन महिला त्यांच्या शेतात काम करत होत्या. आरोपींनी फिर्यादी यांच्या शेतातील बांध सरकवला असे वाटल्याने फिर्यादी यांनी आरोपींना विचारणा केली. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या शेतात प्रवेश करून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. अशोक तापकीर याने लोखंडी गजाने फिर्यादी यांच्या पायावर, नाकावर मारून जखमी केले. संतोष तापकीर याने महिलेला मोबाईल फेकून मारला. त्यानंतर मोबाईल चोरीची तक्रार करण्याची धमकी दिली. बाळू तपकिरी याने दोन महिलांचे केस धरून ओढले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक भदाणे तपास करीत आहेत.

याच्या परस्पर विरोधात संतोष अरुण तापकीर (वय 48, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू जगन्नाथ तापकीर, सचिन तापकीर, संजय तापकीर, रमेश वसंत तापकीर, प्रकाश बापू तापकीर, राजू तापकीर यांची पत्नी, मुलगा आणि सून तसेच इतर तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या शेतातील राडारोडा जेसीबीच्या व कामगारांच्या मदतीने काढत होते. त्यावेळी शेजारील जमिनीचे मालक आरोपी यांनी फिर्यादी सोबत वाद घालून शिवीगाळ केली. दोन महिला फिर्यादी यांचे चुलते अशोक तापकीर यांना मारण्यासाठी धावून आल्या. राजू तापकीर यांच्या मुलाने फिर्यादी यांना मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेतल्याचे म्हणत मारहाण केली. राजू तापकीर याने लोखंडी पाईपने अशोक तापकीर यांच्या डाव्या पायाच्या नडगीवर मारून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक भदाणे तपास करीत आहेत.