शेताजवळ मुरूम टाकल्याच्या कारणावरून भावकीत वाद; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

0
746

चाकण, दि. १० (पीसीबी) – शेतात सामाईक बांधाजवळ असलेल्या ओढ्यात मुरूम टाकल्याच्या कारणावरून भावकितील दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. यातून एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.

संपत लक्ष्मण कड (वय 45) यांच्या फिर्यादीनुसार रमेश ज्ञानेश्वर कड, अभिषेक रमेश कड, मनोज रमेश कड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि रमेश कड हे सख्खे चुलत भाऊ आहेत. फिर्यादी यांच्या घराच्या पाठीमागे सामाईक बांधाशेजारी असलेल्या ओढ्यात आरोपी दोन डंपर घेऊन मुरूम टाकण्यासाठी आले. फिर्यादी यांनी मुरूम टाकण्यास मज्जाव केला असता मनोज कड याने दगडाने फिर्यादी यांना मारले. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलीला आणि पुतण्यालाही दगडाने मारले.

याच्या परस्पर विरोधात रमेश ज्ञानेश्वर कड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संपत लक्ष्मण कड, कैलास लक्ष्मण कड, आकाश कैलास कड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या शेतातील सामाईक बांधाशेजारी असलेल्या ओढयात मुरूम टाकताना आरोपींनी मुरूम न टाकण्यासाठी शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.