Maharashtra

शेततळ्यात बुडून माय लेकीचा दुर्दैवी मृत्यू : आनंदाच्या गणेशोत्सवात गावावर पसरली शोककळा

By PCB Author

September 15, 2021

बारामती, दि.१५ (पीसीबी) : बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे पिण्यासाठी पाणी काढताना शेत तळ्यात पाय घसरून मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात पाण्यात पडलेल्या पैकी एका मुलीचा जीव वाचला आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. अश्विनी सुरेश लावंड (वय ३६), समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या दुर्दैवी घटनेत मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. तर श्रावणी सुरेश लावंड ( वय १२ ) असे वाचलेल्या मुलीचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अश्विनी लावंड या आपल्या दोन मुलींसह शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. तिघींना तहान लागल्याने त्यांनी गट नंबर ९० मधील येथील शेतकरी मेमाणे यांच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या शेततळ्यात पाणी काढण्यासाठी बाटली घेवून उतरल्या होत्या. यावेळी समृद्धी शेततळ्यात बाटलीत पाणी भरताना पाय घसरुन पडली. मुलीला वाचवण्यासाठी अश्विनी यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांचाही पाय घसरला आणि दोघी पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणी देखील पाण्यात पडली. तिघीही पाण्यात बुडाल्या. मात्र श्रावणी शेततळ्याच्या प्लास्टिक कागदाला धरून बाहेर पडली आणि तिने आरडाओरडा केल्याने हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. मात्र ग्रामस्थ जमा होण्यापुर्वीच अश्विनी आणि समृद्धी या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

पोलीस पाटलांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृत देह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.