Maharashtra

शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू; उध्दव ठाकरेंचा इशारा

By PCB Author

June 22, 2019

औरंगाबाद, दि. २२ (पीसीबी) –  शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू, असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार)  दिला.   

औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

यावेळी ठाकरे म्हणाले की,  काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडू,  असा इशारा  त्यांनी दिला.

शिवसेनेला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती हवी आहे. काही निर्णय घेताना आर्थिक बाबींचाही विचार करावा लागतो. त्यामुळे दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळूनही हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे कृषी कर्जवाटपात दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना  दिले आहेत, असे   उद्धव ठाकरे यांनी सांगितले.