Maharashtra

शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी – गृहमंत्री अनिल देशमुख

By PCB Author

June 23, 2020

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहे. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी द्यावी. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या कर्जासाठी भाजपच्या सिमा सावळे आग्रही –

विदर्भात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारत असल्याचा प्रश्न जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व पिंपरी चिंचवड भाजप नगरसेविका सिमा सावळे यांनी उपस्थित केला होता.  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. बँकेचे झोनल मॅनेजर यांना  भेटून प्रसंगी आंदोलन करू असा इशारा दिला होता. अहमदनगमध्ये शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भाजपकडून आंदोलन केले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.