Maharashtra

शेतकऱ्यांच्या ‘नाईट लाईफ’चीही चिंता करा – देवेंद्र फडणवीस

By PCB Author

February 08, 2020

परभणी,दि.८(पीसीबी) – एखादे काम करायचे नसेल तर जाणीवपूर्वक तांत्रिक गोष्टी सांगून बहाणे केले जातात. सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. मुंबईत ‘नाईटलाईफ’ सुरू करून श्रीमंतांच्या पोरांची चिंता सरकारने दूर केली, पण या सरकारने शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’चीही चिंता करावी, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

वॉटर ग्रीडसह अनेक योजनांना स्थगिती देण्याचा सरकारचा इरादा दिसून येत आहे. आधीच्या सरकारने सुरू केलेले कल्याणकारी उपक्रम बाजूला ठेवले तर विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

नानाजी देशमुख यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या योजनेतून चार हजार गावांमध्ये चार हजार कोटी रुपयांच्या योजनांना चालना दिल्याने या गावांमधील शेती शाश्वत होईल, असेही ते म्हणाले. लोणीकर यांनी आपल्या भाषणात वॉटर ग्रीड प्रकल्पाचा उल्लेख केला होता, त्यावर बोलताना फडणवीस यांनी इस्राएलच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा प्रकल्प आखला गेला आहे. पाच जिल्ह्यांच्या निविदाही निघाल्या. मात्र, या प्रकल्पाला सध्याच्या सरकारने स्थगिती दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान, योजनेत काही बदल करायचे असतील तर ते जरूर करावेत, मात्र कोणत्याही परिस्थितीत ‘वॉटर ग्रीड’चे काम थांबविण्यात येऊ नये, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.