Maharashtra

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं समजताच शांत बसले आहेत – चंद्रकांत पाटील

By PCB Author

July 17, 2020

महाराष्ट्र.दि.१७(पीसीबी) – शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेणारे आज आमदारकी मिळणार असल्याचं समजताच शांत बसले आहेत, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे. यासंदर्भात यांनी एक ट्विट केलं आहे.

“राज्यात दुधाला सध्या २२ रुपये इतका दर मिळत आहे. २२ रुपये इतक्या साध्या रकमेतून मुलभूत खर्चही भागवणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे झाले आहे. राज्यात लॉकडाउन होण्याआधी दुधाला साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. मात्र तरीही आता कोणीही कुठेही निषेध करताना दिसत नाही. दुधासाठी आंदोलन करणारे राजू शेट्टी आता अगदी शांत आहे. दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेण्याचं तुम्ही एकदा म्हटलं होतं. मात्र आता त्यांच्याकडून या प्रकरणावर कोणतेही वक्तव्य ऐकायला मिळत नाही. राजू शेट्टी, कधी आंदोलन करणार आहेत. हे आम्हाला पाहायचं आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या दुधाच्या किंमतीत कोणतीही कपात करण्यात आली नाही, मग शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे दूध काय वेगळ्या पद्धतीचं आहे का? त्यात एवढी फारकत का? राजू शेट्टी यांना आणखी एक गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे युरिया देखील कुठेच मिळत नाहीये. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्त असून, संकटात सापडले आहेत,” असं पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत. pic.twitter.com/oj8Rv436AG

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 17, 2020

दरम्यान “बांधावर जाऊन गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आता घरात बसून फेसबुक लाईव्ह करत आहेत. राजू शेट्टीजी तुम्हाला आमदारकी मिळणार असल्याचे कळले. मात्र, आमदार झाल्यानंतरच तुम्ही शेतकऱ्यांसाठी पुढाकार घ्याल, तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल आणि तोपर्यंत अगदी गप्प राहाल असं वाटत आहे,” असा टोला पाटील यांनी शेट्टी यांना लगावला आहे.