शेतकरी म्हणतात हवामान खात्यापेक्षा आमचा नंदीबैलच बरा!

453

औरंगाबाद, दि. १३ (पीसीबी) – हवामान खात्याचे पावसाबद्दलचे अंदाज सातत्याने चुकत असल्याने शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी एक अनोखे आंदोलन केले. त्यांनी थेट नंदीबैलालाच पाऊस पडणार का? दुष्काळ पडेल की अतिवृष्टी होईल? शेतकरी सुखावेल का? असे प्रश्न विचारले आहेत. हवामान खात्याचे सगळेच अंदाज चुकत आहेत. हवामान खात्याने परवाच मुंबईत अतिवृष्टी होईल असा इशारा दिला पण मुंबईत पाऊसच पडला नाही. त्याआधीचे अंदाजही चुकले आहेत. मराठवाड्यातही पाऊस पडेल सांगितले होते मात्र इथे साधा शिडकावाही नाही. त्यामुळे आम्ही नंदीबैलालाच विचारतो आहोत की पाऊस पडेल का? असे म्हणत जयाजीराव यांनी थेट नंदीबैलालाच प्रश्न विचारले आहेत आणि हवामान खात्याच्या चुकलेल्या अंदाजांचा निषेध नोंदवला आहे.

नंदीबैलाला प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ जयाजीराव सूर्यवंशी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. औरंगाबादमध्ये हे आंदोलन करण्यात आले मात्र या संदर्भातला हा व्हिडिओ पुणे हवामान विभागाच्या कार्यालयाबाहेर झाल्याचे सांगत तो व्हायरल झाला आहे. पुणे हवामान विभागाने मात्र असे कोणतेही आंदोलन झाले नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान जयाजीराव सूर्यवंशी यांनी मात्र आपण हवामान विभागाच्या सततच्या चुकत असलेल्या अंदाजांना कंटाळून शेवटी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय अशी विनंती करतो आहोत असे म्हटले आहे.

मराठवाड्यात इतकी वाईट परिस्थिती आहे की पावसाचा अजिबात पत्ता नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे आम्ही सरकारकडे कृत्रीम पावसाची मागणी केली आहे मात्र सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हवामान खातं फक्त एवढेच सांगतेय की तुम्ही चिंता करू नका पाऊस नक्की पडेल. मात्र हवामान खात्याचे सगळे अंदाज चुकले आहेत, त्यामुळे आता पाऊस पडणार की नाही याचे उत्तर नंदीबैलाला विचारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही असेही जयाजीराव यांनी म्हटले आहे.