शेतकरी नेत्यांना आता ‘लुक आउट नोटीस’

0
235

नवी दिल्ली, दि.२८ (पीसीबी) : प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व नेत्यांना लुक आउट नोटीसही पाठवण्यात आली असून त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचाराबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पीटीआयच्या वृत्तानुसार, शेतकरी नेत्यांना त्यांचे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबिरसिंह राजेवाल, बुटासिंग बुर्जगिल, योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि जिगिंदर सिंह उग्रहा यांच्यासह ३७ शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. प्रजासत्ताकदिनी दिल्ली पोलीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये ट्रॅक्टर परेड काढण्यासंदर्भात झालेल्या कराराच्या नियमाचा भंग झाल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी रात्री उशीरा आढावा बैठक घेतली. तसेच गुरुवारी सकाळी देखील त्यांनी परिस्थीचा आढावा घेतला. तसेच याबाबत अधिकारी वर्गही लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

‘शेतकरी संघटनांनी नियमांचे पालन केले नाही’: दिल्ली पोलीस
दिल्ली पोलिसांनी काल पत्रकार परिषेदत सांगितलं की, शेतकरी संघटनांनी नियमांचे पालन केले नाही. दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५,००० ट्रॅक्टर्स रस्त्यावर आणण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, याचे उल्लंघन करण्यात आले.