शेतकरी कर्ज घोटाळा प्रकरण उघडकीस

0
695
मुंबई, दि,१७ (पीसीबी) – कुठल्याही प्रकारचे कर्ज न घेता, तसेच ज्या बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत, ती बँकही न पाहिलेल्या आदिवासींना कर्ज वसुलीची नोटिसा आल्यावर येथील शेतकरी कर्ज घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांची कर्जही महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या चौकटीत बँक अधिकाऱ्यांनी व संबंधित संस्थेने बसविल्याने या प्रकरणात शासनाचीही मोठी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत वाडा तहसीलदारांकडे संबंधित शेतकऱ्यांनी तक्रार देऊन या प्रकरणी सहभागी असलेल्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करून अनेकांना मोठा दिलासा दिला असला तरी याच कर्जमाफीमुळे राज्यात अनेक शेतकऱ्यांना बोगस कर्जे कशी वाटप केली जातात आणि त्याचा लाभ अनेक सामाजिक संस्था, बँका व दलाल कसे उठवतात याचे जिवंत उदाहरण वाडा तालुक्यातील आदिवासी, ग्रामीण भागात घडलेल्या या प्रकारामुळे उघडकीस आले आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या उज्जेनी, विऱ्हे, आखाडा येथील आदिवासी समाजातील अशिक्षित शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत आयडीबीआय बँकेच्या कुडूस शाखेने सिजेंटा फाऊंडेशन यांच्या मार्फत तीन वर्षांपूर्वी किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या असलेल्या नियमांच्या अधिन राहून कर्जवाटप केले होते. येथील शेतकऱ्यांच्या नावाने ४० ते ५० हजार रुपयांची कर्ज प्रकरणे करून हा कर्ज घोटाळा करण्यात आला असल्याचे वाडा येथील ‘आपले सरकार’ सेवा केंद्राचे संचालक अनंत सुर्वे यांच्या सजगतेमुळे उघड झाला आहे. सिंजटा फाऊंडेशनचे प्रकल्प अधिकारी अविनाश वामन या इसमाने दोन-तीन एजंट नेमून वाडा तालुक्यातील उज्जेनी, विऱ्हे, आखाडा या परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना गाठले व शेतीसाठी खते, बियाणे मिळवून देतो असे सांगून त्यांचे जमिनीची कागदपत्रे घेतली. काही कोऱ्या अर्जावर व चेकवर स्वाक्षऱ्या घेतल्या. स्वाक्षरी घेतलेले अर्ज व जमिनीची कागदपत्रे वाडा तालुक्यातील आयडीबीआय या बँकेच्या कुडूस शाखेतून संबंधित शेतकऱ्यांच्या नावाने खाते उघडून ५० ते ६० हजार रुपयांची कर्ज उचलली आहेत. गेल्या तीन वर्षांपूर्वी हा कर्ज घोटाळा करण्यात आला आहे. संबंधित शेतकऱ्यांना आयडीबीआय बँक शाखा प्रमुख कुडूस यांच्या सहीच्या कर्ज वसुलीच्या नोटिसा जानेवारी २०२० च्या शेवटच्या आठवडय़ात येऊ  लागल्याने हा प्रकार खऱ्या अर्थाने चर्चेत आला. कर्जाच्या नोटिसा आलेल्या सर्वच शेतकऱ्यांनी कुडूस येथील आयडीबीआय बँक बघितलेली नाही. या कर्जासंबंधी मध्यस्थी असलेला जालिंदर बुधर यास या शेतकऱ्यांनी विचारले असता तुमचे कर्ज माफ झाले आहे, तुम्ही आधार कार्ड घेऊन माझ्या सोबत ‘आपले सरकार’ केंद्रात या. केंद्रात आल्यानंतर केंद्रचालक अनंत सुर्वे यांना या प्रकरणी संशय आल्याने त्यांनी संबंधित शेतकऱ्यांकडे विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणी विऱ्हे येथील सुरेश भोंगे, वसंत बातास, लामा रिंजड व बंधु बरफ या शेतकऱ्यांनी या प्रकरणी वाडा तहसीलदारांकडे तक्रार केली आहे.