शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही – देवेंद्र फडणवीस

0
290

मुंबई,दि.२४(पीसीबी) – सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना २५ हजार ते ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊ असं सरकारनं सांगितलं होतं. सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्तेत येताना त्यांनी याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या मात्र, अद्याप त्यांची पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे सरकारची फसवणुकीची मालिका सुरुच असून याबाबत सभागृहात सरकारला धारेवर धरणार आहोत असे, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीस म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना २५ हजार ते ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊ असं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, यातील एक नवा पैसा अद्याप त्यांना मिळालेला नाही. त्याचबरोबर कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या लावू असंही या सरकारनं सांगितलं होतं. तसेच शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु, त्यांचा सातबारा कोरा करु असं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र, यांपैकी एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली असून ही फसवणुकीची मालिका अद्याप सुरु आहे.

दरम्यान, राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याबाबत सरकारची संवेदनशीलता दिसत नाही. त्यामुळे प्रामुख्याने आम्ही हे विषय सभागृहात मांडणार आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.