शेतकरी आंदोलनात भाग घेण्यासाठी निघालेले योगेंद्र यादव यांना अटक आणि सुटका

0
440

तिरुवन्नामलाई, दि. ९ (पीसीबी) – तमिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात रस्त्याच्या रुंदीकरणाविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात भाग घेण्यासाठी निघालेले स्वराज पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यादव यांच्यासह अन्य ४० सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर रात्री उशीरा त्यांची सुटका करण्यात आली, त्यानंतर मध्यरात्री त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई-सालेम हा द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्यात येणार असून, या प्रकल्पामध्ये येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. येथील स्थानीक शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध करीत आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी शनिवारी योगेंद्र यादव तिरुवन्नामलाई येथे गेले होते. मात्र, त्यांना शेतकऱ्यांना भेटू न देता त्यांच्यासह इतर ४० सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशीरा सोडून देण्यात आले. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप यादव यांनी केला. तर, यादव यांचे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत.