Desh

शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १,१०० अंकांनी कोसळला

By PCB Author

September 21, 2018

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – मागच्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु आहे. त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटत आहेत. शुक्रवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरला होता तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ३६७ अंकांची घसरण झाली होती. बँकिग क्षेत्रातील शेअर्सना या पडझडीचा सर्वाधिक फटका बसला असून येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

दुपारच्या सत्रात सेन्सेक्स १,१०० पेक्षा जास्त अंकांनी घसरुन ३५,९९३ अंकांवर पोहोचला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ११ हजारच्या खाली येऊन १०,८६६ अंकांवर पोहोचला होता. बँकिंग, आयटी आणि फार्मा सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण झाली.

सुरुवातीच्या घसरणीनंतर दुपारी दीडच्या सुमारास शेअर बाजार काही प्रमाणात सावरला. महत्वाचं म्हणजे शुक्रवारी सकाळच्या सत्रात चांगली सुरुवात झाली होती. शेअर बाजार ३०० अंकांनी वधारला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण, आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील तेलाच्या वाढत्या किंमती आणि अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध याचा फटका शेअर बाजाराला बसत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राणा कपूर यांना पदावरुन पायउतार होण्यास सांगितले आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली.