Pune

शुक्रवार पेठेत दिवसाढवळ्या तरुणावर गोळीबार करुन धारदार कोयत्याने वार

By PCB Author

October 31, 2018

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळीबार करुन धारदार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (बुधवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास शुक्रवार पेठेतील शिंदे आळीमध्ये घडली.

मंगेश धुमाळ (वय ३२, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. खडक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मंगेश धुमाळ या तरुणावर काही हल्लेखोरांनी गोळीबार करुन धारदार कोयत्याने वार केले. या घटनेमध्ये गंभीर जखमी धुमाळ कसाबसा आपला जीव वाचवून थेट खडक पोलीस ठाण्यात पोहचला. या घटनेमुळे सुरुवातील पोलीस देखील घाबरले होते. त्यांनी तातडीने धुमाळ याला ससून रुग्णालयात दाखल करुन घटना स्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, या घटनेत मंगेशच्या पायाला गोळी लागली असून त्याच्या डोक्यात कोयत्याचे गंभीर वार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजणक आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस दाखल झाले आहेत.