शुक्रवारी पिंपरी महापालिकेत ध्वजारोहण नसेल – महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची माहिती

0
529

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त म्हणजेच १ मे रोजी पुणे जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यामुळे यंदा पिंपरी महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार नसल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात येतो. महापालिकेच्या प्रांगणात महापौरांच्या हस्ते आणि आठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग अध्यक्ष, क्षेत्रीय अधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम करण्यात येतो.
तथापि, यावर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यंदाचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्र दिनाच्यादिवशी महापालिका मुख्यालय, प्रभागामध्ये अथवा महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात ध्वजारोहणच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, याची सर्व विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिका-यांनी दक्षता घेण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त पवार यांनी केली आहे.