शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
461

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज (रविवार) दुपारी निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

आज सकाळी साडे अकरा वाजता निजामुद्दीन येथील निवासस्थानी शीला दीक्षित यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयात नेण्यात आले. यावेळी राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील हजारो लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी नेत्यांनी   शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान,  शीला दीक्षित यांचे शनिवारी (दि.२०)  दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.