शीखदंगल प्रकरणी काँग्रेस नेता सज्जन कुमार दोषी; जन्मठेपेची शिक्षा

0
531

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – दिल्ली उच्च न्यायालयाने १९८४ मधील शीखदंगली प्रकरणी काँग्रेस नेता सज्जन कुमारला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या  सज्जन कुमारला कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्त केले होते. याविरोधात दिल्ली न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज (सोमवारी) न्यायालयाने निकाल देताना सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.  

१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत ६ जणांची हत्या झाली होती. या प्रकरणी सज्जन कुमार, ब्रह्मानंद गुप्ता, खुशाल सिंग, वेद प्रकाश आणि आणखी एकाविरोधात हत्येचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला होता.  या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. जी.टी.नानावटी आयोगाने २००५ मध्ये सूचना केल्यानंतर पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर जानेवारी २०१० मध्ये सीबीआयने या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

कनिष्ठ न्यायालयाने सज्जन कुमारला दोषमुक्त करताना अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावाही उच्च न्यायालयात  सुनावणीदरम्यान करण्यात आला होता. सज्जन कुमारला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिसांपुढे शरण येण्याची मुदत दिली आहे. तर  सज्जन कुमारसह कॅप्टन भागमल, गिरीधारी लाल आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक बलवान खोखार या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर किशन खोखार आणि महेंद्र यादव या दोघांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.