शिस्तीचे वळण राजांना लागत आहे; शिवसेनेचा उदयनराजेंना चिमटा

0
397

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांची कॉलर उडवण्याची स्टाईल आणि बोलण सुप्रसिद्ध आहे. त्यांच्या याचे स्टाईलवरून शिवसेनेने उदयनराजेंना जोराचा चिमटा काढला आहे. “भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपाचा डोलारा उभा आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे”, असे मिश्कील भाष्य शिवसेनेने केले आहे.

शिवसेनेने मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून उदयनराजे भोसले यांच्या शिस्तीवर प्रकाशझोत टाकला आहे. “सातारचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचा मार्ग स्वीकारला आहे. आयाराम-गयारामांचा मुसळधार मोसम सध्या सुरूच आहे. पाऊस थांबत नाही तसा हा मोसमही थांबत नाही. इतर सर्व मंडळी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेत असतात, पण उदयनराजे हे शिवरायांच्या सातारच्या गादीचे तेरावे वंशज असल्याने त्यांचा प्रवेश अमित शहा यांच्या दिल्लीतील बंगल्याच्या हिरवळीवर झाला आहे. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!”, असे शिवसेनेने म्हटले आहे.