शिवसेनेला खिंडार पडणार ?

0
194

पुणे, दि. १० (पीसीबी) : महापालिका निवडणुकिपूर्वीच राज्यातील महाआघाडी सरकारला सुरूंग लागणार अशी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारला आता अडीच वर्ष होत आली आहेत. शिवसेनेसोबत युती करून राज्याच्या सत्तेत पुन्हा येण्याची स्वप्न रंगवणाऱ्या भाजपला हिसका दाखवत सेनेने राष्ट्रवादी-काॅंग्रेसशी हातमिळवणी करत मुख्यमंत्री पद पटकावले. भाजपला हा धक्का सहन होणारा नव्हता म्हणून अगदी पहिल्या दिवसापासूनच या तीन पक्षाचे सरकार कधी कोसळणार याचे मुहूर्त भाजपच्या नेत्यांकडून काढले जात होते, अद्यापही ते सुरूच आहे. शिवसनेचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात असून तीन नाराज आमदार गळाला लागल्याचा भाजपा गोटातून सांगण्यात येते.

 

शिवसेनेलाच खिंडार पाडायचे आणि राज्यात पुन्हा सत्ता मिळवायची असे प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरू आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना शिवसेनेतीलच काही नाराज आमदारांचे पाठबळ मिळते की काय? अशी शंका काही आमदारांच्या हालचाली आणि आपल्याच पक्ष आणि सरकारला अडचणीत आणणाऱ्या विधानांवरून येऊ लागली आहे. भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये कॅबीनेट मंत्री राहिलेले परंतु महाविकास आघाडीमध्ये दुर्लक्षित असे शिवसेनेचे भूम-परांड्याचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या नाराजीपासून या नाट्याला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असे म्हणावे लागेल. तानाजी सांवत यांनी देखील पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांबद्दलची नाराजी अनेकवेळा जाहीरपणे बोलवून दाखवली आहे.

पैशाच्या जोरावर हवे ते मिळवण्याची भाषा आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कायम आपल्या प्रभावाखाली ठेवण्याची सावंत यांची पद्धत आता अनेकांना खटकू लागली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या सावंत यांनी सध्या वेगळा विचार सुरू केल्याचे अलिकडच्या त्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या बैठकांतून समोर आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात राजकारण करत असलेल्या सावंत यांचा वावर आणि प्रभाव सोलापूर जिल्ह्यात देखील आहे. परंतु तिथे देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज झालेल्या शिवसैनिकांनी अनेकदा मुंबई दरबारी तक्रारींचा पाढा वाचलेला आहे. सावंत यांच्याच प्रभावात असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील बापू यांनी देखील दोन दिवसांपूर्वीच वादग्रस्त विधान करत आपल्याच पक्षाची आणि सरकारची गोची केली.
आपल्याला मिळालेला विजय हा केवळ भाजपमुळेच होता, शिवसेनेची इथे फक्त अकराशे मतं होती. या सरकारमध्ये आम्हाला कुणीच विचारत नाही, असा सूर त्यांना आळवला होता. आता त्यावरून घुमजाव करत उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आपण विजयी झालो असे म्हणत त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सावंत यांच्याप्रमाणेच त्यांच्या मनातील खदखद बाहेर आलीच.