शिवेसना नगरसेवक निलेश बारणे कोरोना पॉझिटिव्ह

0
405

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – सतत लोकसंपर्कात आल्याने शहरातील काही लोकप्रकिनिधींवर कोरोना अक्षरशः कोपला आहे. आमदार महेश लांडगे यांच्यासह त्यांची पत्नी आणि कुटुंबातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. तत्पूर्वी दापोडी येथील नगरसेवकाच्या संपर्कातील सहा लोक पॉझिटिव्ह निघाले. पिंपळे गुरव येथील नगरसेविका आणि त्यांचे माजी नगरसेवक पती यांच्यासह घरातील लोक कोरोना बाधित झाले. महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचेही नाव या यादित आले. आज थेरगाव येथील शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या लढाईत झोकून देऊन काम कऱणारे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाही होम क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. बहुतांश बडे नेते थेरगावच्या बिर्ला रुग्णालयात उपचार घेत आहेत.

शहरात जे लोकप्रतिनिधी कोरोनाच्या निमित्ताने कायम लोकांच्या मदतीसाठी फिरतात, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतात, रुग्णालयांना भेटी देतात, गोरगरिबांना मदत वाटप करत घरोघऱी फिरतात त्यांचा कुठेतरी कोरोना बाधितांशी संपर्क आल्याने तेसुध्दा बाधित झाले आहेत. आमदार लांडगे यांच्या संपर्कातील १२८ लोकांचे रिपोर्ट निगेटटिव्ह आले. महापालिका स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांच्यासह अन्य नगरसेवकांचे रिपोर्टसुध्दा निगेटिव्ह आल्याने त्यांनी सुस्कारा सोडला. मात्र, निलेश बारणे यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने आता त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी सुरू आहे, असे सांगण्यात आले.

संकट आणखी बिकट होते आहे. शहरातील रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. तीन हजाराच्या पुढे आकडा गेला तो जुलै अखेर १० हजारा पर्यंत पोहचेल असा आयुक्त हर्डीकर यांचा अंदाज आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी यासाठी महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणावर विविध मार्गांनी प्रयत्न करत आहे, मात्र नागरिकांनी ताळतंत्र सोडल्याने रुग्णांची संख्या रोज वाढतेच आहे.

शहरातील पोलिस कंटेन्मेंट झोन मध्ये लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अहोरात्र गस्त घालत असतात. आता त्यांनाही मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर आले. आज तब्बल सात पोलिसांना कोरोना पॉझिटिव्ह निघाला. यापुर्वी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील दोन डॉक्टर पॉझिटिव्ह निघाले होते, ते कव्हर झाले.