शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा अमाप उत्साहात साजरा

0
926

रायगड, दि. ६ (पीसीबी) – जय भवानी…जय शिवाजी…शिवाजी महाराज की जय..अशा गगनभेदी घोषणा..शिवभक्तांचा सळसळता उत्साह…चित्तथरारक तलवारबाजीची प्रात्यक्षिके… अशा भारावलेल्या वातावरणात  छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५४ वा राज्याभिषेक सोहळा हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज (बुधवार) साजरा झाला.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक आणि रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला. यावेळी  लाखो शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावली होती.

आज सकाळी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शिवमुद्रा ढोल पथकाच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे राजसरदरेवर आगमन झाले. यंदा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील ‘शिवरुद्रा’ या ढोलताशा पथकास बहुमान मिळाला आहे. शिवरायांच्या उत्सवमूर्तीचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते विधिवत पूजन, अभिषेक करण्यात आला.

दरम्यान, शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ ला दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या सुवर्ण दिनाची स्मृती कायम राहावी, या उद्देशाने अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहाने साजरा करण्यात येतो.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही जुन्या वास्तूंमध्ये नवीन काही बांधण्याचा आपल्याला अधिकार नाही. म्हणून रायगड किल्ल्या खाली ८८ एकर जमीन संपादित केली आहे. तिथे नवीन रायगड उभारण्यात येईल, असे सांगत रायगडाला हात न लावता छत्रपतींचा इतिहास पुन्हा जिवंत करू, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी दिली.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याला जिजाऊंच्या वाड्याजवळ ८८ एकर जागेवर रायगड उभारले जाईल. रायगडावर ज्या गोष्टी करता येणार नाहीत. त्या आपण तिथे उभा करूयात. इतिहासकारांना, संशोधकांना त्यांच्याकडील पुरावे, स्केचेस, छायाचित्र देण्यासाठी पत्रे लिहिली आहेत. आपण ते रायगड प्राधिकरणाला देऊयात. ही संधी सर्वांना आहे, सगळ्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.