Maharashtra

शिवाजीराव आढळराव पाटलांविरोधात लढण्याबाबत बोललोच नव्हतो; अजित पवारांचे घूमजाव

By PCB Author

January 20, 2019

जळगाव, दि. २० (पीसीबी) – माझ्या  विधानाचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढला आहे, असे घूमजाव करत राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या विधानावर खुलासा केला आहे.    

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेनिमित्त अजित पवार जळगांवमध्ये आले होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचा भाग होता. त्यामुळे मला हा भाग ओळखीचा आहे. उद्या जर पक्षाने आदेश दिला तर निवडणुक लढवायची तयारी ठेवली पाहिजे, असे मी शिरूरमध्ये बोलताना म्हणालो होतो, असा खुलासा त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिरूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक  लढवण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर येथून निवडून नाही आलो, तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे गर्जना केली होती.

त्यावर तुम्ही शिरूर लोकसभा निवडणुक लढवाच, असे आव्हान  शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवारांना दिले होते. मी सुध्दा येथून निवडणूक नाही जिंकलो, तर मराठ्यांची औलाद सांगणार नाही, असे प्रतिआव्हान आढळरावांनी पवारांना दिले होते.