शिवस्मारकाच्या कामात अनियमितता; चौकशी न केल्यास इतिहास माफ करणार नाही – विनायक मेटे

0
588

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – शिवस्मारकाच्या कामात अनियमितता झाली आहे. त्यामुळे या कामाची चौकशी  करण्यात यावी, अशी मागणी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात केली आहे. दरम्यान, ही चौकशी न केल्यास विधान परिषदेत अधिकाऱ्यांवर  हक्कभंग आणला जाईल, असा इशारा मेटे यांनी या पत्रात दिला आहे.  

त्याचबरोबर या पत्रात भयानक चुका आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मेटे यांनी हे पत्र १५ सप्टेंबर २०१८ रोजी लिहिले होते. या पत्रात सार्वजनिक बांधकाम विभागातील मंत्रालयीन अधिकारी प्रकल्प अनैतिकतेने पुढे रेटत आहेत, असा आरोपही केला आहे.

तसेच शिवस्मारकाचे सल्लागार मे. इजिस इंडिया आणि कंत्राटदार एल अँड टी  कंपनीसोबत मंत्रालयीन अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी न केल्यास इतिहास आपल्याला कदापी माफ करणार नाही, असे मेटे यांनी म्हटले आहे.