शिवसैनिकांनो, पुढचा नगरसेवक मीच होणार ही खूणगाठ मनाशी बांधून लोकाभिमुख काम करा – श्रीरंग बारणे

0
220

‘शिवसेना मिशन 2022′ अंतर्गत काळेवाडीत बैठक

पिंपरी, दि.२०(पीसीबी) – मागील चार वर्षात पालिकेमुळे शहरवासीयांना पाणी, कचरा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याचा अर्थ पालिकेचा कारभार शून्य आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. शिवसैनिकांनी वर्षभरात लोकांपर्यंत जावून लोकाभिमुख होऊन काम केले, तर निवडून येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. पुढचा नगरसेवक मीच होणार ही खूणगाठ मनाशी बांधून लोकाभिमुख काम करा, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना केले.

पालिका निवडणूक एक वर्षावर येवून ठेपली आहे. शिवसेनेने आगामी निवडणुकीची आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यासाठी महापालिका निवडणूक ‘शिवसेना मिशन 2022′ अभियान सुरु केले आहे. त्याअंतर्गत शिवसेनेच्या प्रभागनिहाय बैठका सुरु आहेत. काळेवाडी-रहाटणी विभागाची बैठक आज (शनिवारी) काळेवाडीत झाली. यावेळी खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, चिंचवड संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा संघटक हरेश नखाते, शिवसेना अल्पसख्यांक प्रमुख हाजी दस्तगीर मणियार, माजी विभागप्रमुख अरुण आंब्रे, संजय नरळकर, एकनाथ मंजाळ, सुनील पालकर, प्रहारचे संजय गायके, गणेश आहेर, नरसिंग माने, दत्ता गिरी, ज्येष्ठ नागरिक पद्दामकर जांभळे, गणेश वायभट, प्रदीप बांद्रे, डॉ. कुलथे, डॉ. पन्नासै, अमोल राडोठ, महिला विभाग प्रमुख डॉ. भाग्यश्री महस्के विभाग प्रमुख शिल्पा अनपन,सुजाता नखाते,वंदना वायभट,मीरा वरात आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, एका वर्षाच्या कालावधीत शिवसैनिकांनी शिवसेनेचे कार्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय घरा-घरापर्यंत पोहोचवावेत. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक मतदारांपर्यंत संपर्क वाढवा. संपर्क वाढल्यानंतर भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांची जादू चालणार नाही. शिवसेनेचा कार्यकर्ता अशी स्वत:ची ओळख तयार करावी. आपल्या भागातील अडी-अडचणी समजून घेवून प्रश्न मार्गी लावा. प्रत्येक विभागात याच पद्धतीने काम करुन मतदारापर्यंत शिवसेनेचे काम पोहचवा, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, कोणाला विरोधक समजू नका, सर्वांना सोबत घेवून काम करावे. मतदार कोणत्याही पक्षाचा बांधिल नसतो. मतदाराला ‘कॅप्चर’ करण्याचे काम करा. मतदार तुमच्याबरोबर राहील. कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण करावी. शिवसेना तुमच्यासोबत आहे. पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा, अशा सूचना खासदार बारणे यांनी दिल्या.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, गटप्रमुख महत्वाचा दुवा आहे. त्यांनी घरोघरी नागरिकांशी संपर्क वाढवा. विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुखांनी समन्वयाने संघटनेची बांधणी करावी. परिसरातील नागरिकांच्या अडी-अडचणी, प्रश्न समजावून घ्यावेत. त्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावावेत. सुख, दुख:त सहभागी व्हावे. शिवसैनिकांनी या पद्धतीने काम केल्यास आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ नक्कीच वाढेल.

ठाकरे सरकारच्या माध्यमातून शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी सांगितले . प्रास्ताविक हरेश नखाते यांनी केले. काळेवाडी-रहाटणी विभागातील निवडणूक निहाय माहिती विभागप्रमुख गोरख पाटील यांनी दिली. प्रदीप दळवी यांनी आभार मानले.

राष्ट्रवादीच्या सरचिटणीस योगिता विकास चौधरी, शारदा चौधरी, सविता सोनवने, पुजा निकम, रेखा तायडे, निर्मला पाटील, रेखा पाटील, वंदना सर्वगौड अंजली काटे या महिलांनी खासदार बारणे यांच्या उपस्थिती प्रवेश केला अॅड. उर्मिला काळभोर, अनीता तुतारे,सुजाता नखाते यांनी शिवबंधन बांधून महिलांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.