शिवसेनेसाठी पालघर सोडले, आणखी एखादा मतदारसंघ सोडू; पण मावळ भाजपसाठी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

0
1124

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – भाजप-शिवसेना युतीत पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. तसेच शिवसेनेला आणखी एखादा मतदारसंघ देण्याची भाजपची तयारी आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांची पिंपरी-चिंचवडमध्ये असणारी राजकीय ताकद पाहता मावळ लोकसभा मतदारसंघ जगताप यांच्यासाठी सोडण्याचा शिवसेनेकडे आग्रह धरण्यात आला आहे. त्याबाबत दोन्ही पक्षात बोलणी सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ मतदारसंघ भाजपकडे घेण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्यावेळी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मावळ मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली. सांगवीतील भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांनी मुख्यमंत्र्यांपुढे आक्रमकपणे भूमिका मांडली. शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ते राहत असलेल्या थेरगाव भागातील नगरसेवकांचाच विरोध आहे. त्यामध्ये सहा बारणे आडवानाचे नगरसेवक आहेत. त्यावरून खासदार बारणे आणि शिवसेनेची काय राजकीय स्थिती आहे, हे स्पष्ट होते. श्रीरंग बारणे हे उमेदवार असल्यास निवडून येणार नाहीत, हे राजकीय वास्तव आहे. मावळ मतदारसंघात शिवसेनेची राजकीय अवस्था गलितगात्र आहे.

अशा परिस्थितीत आम्हाला लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काम करण्यास भाग पाडल्यास युतीचा पराभव निश्चित असल्याचे हर्षल ढोरे यांनी सांगितले. मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करण्याची भाजपच्या कोणत्याच नगरसेवकाची किंवा कार्यकर्त्याची इच्छा नाही. युतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना आमच्यावर लादण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाने करू नये. मावळ मतदारसंघ भाजपला न मिळाल्यास पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचे दूरगामी राजकीय परिणाम पक्षाला आणि कार्यकर्त्यांना भोगावे लागणार आहेत. तसे होऊ नये यासाठी कोणत्याही परिस्थितीत मावळ मतदारसंघ भाजपकडे घ्या, अशी आक्रमक भूमिका हर्षल ढोरे यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अभिषेक बारणे व इतर नगरसेवक कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्र्यांपुढे हीच भावना मांडली.

मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. युतीमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला आहे. शिवसेनेला आणखी एखादा मतदारसंघ देण्याची भाजपची तयारी आहे. परंतु, मावळ लोकसभा भाजपकडे घेण्याचा प्रयत्न आहे. मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी शिवसेनेकडे आग्रह धरण्यात आला आहे. मतदारसंघ वाटपाची बोलणी सुरू आहे. त्यामध्ये भाजपने मावळचा आग्रह धरला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांची राजकीय ताकद पाहता मावळ मतदारसंघात ते सहज विजयी होतील, याचा पक्षाला पूर्ण विश्वास आहे. पक्ष सुद्धा आमदार जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. येत्या चार-पाच दिवसांत मावळ मतदारसंघाबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी भाजप नगरसेवकांना दिले.