Maharashtra

शिवसेनेशी भाजपची युती होईलच; मुख्यमंत्र्यांना ठाम विश्वास

By PCB Author

October 28, 2018

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय वास्तवाची जाण ठेवूनच राजकारण केले पाहिजे. दोन्ही काँग्रेस आघाडीकरून लढत असताना शिवसेना आणि भाजप वेगळे लढले, तर  दोघांनाही फटका बसणार आहे. तसेच विरोधकांना लाभ होणार आहे. ही वस्तुस्थिती असताना जे हिंदुत्ववादी म्हणायलाही घाबरतात, त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीच पाठिंबा देणार नाहीत, असे सांगून शिवसेनेशी भाजपची युती होईलच, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला ३१ ऑक्टोबरला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी  आपली भूमिका मांडली.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणायलाही घाबरतात, अशा बेगडी निधर्मीवाद्यांना निवडून देण्याचे आणि आपल्या घराला आग लावून गंमत पाहण्याचे काम उद्धव ठाकरे कधीच करणार नाहीत, असे ते म्हणाले.

युती  होणार का? यावर मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होईलच. युतीबाबत शिवसेनेसोबत अधूनमधून चर्चा होते, पण सातत्याने नाही. भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येणे ही अपरिहार्यता आहे. आम्ही वेगळे लढलो तर हिंदुत्वाच्या मतांचे विभाजन होईल. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नुकसान होऊन काँग्रेस- राष्ट्रवादीला फायदा होईल, असे ते म्हणाले.