शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटेल- दिवाकर रावते

0
421

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४४ जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असे विधान करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली. रावते यांच्या या भूमिकेचे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. रावते काहीच चुकीचे बोलले नाहीत, असे ते म्हणाले. शिवसेना नेत्यांच्या या भूमिकेमुळे युतीच्या जागावाटपाचा तिढा आणखी वाढला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपावर अद्याप दोन्ही पक्षांमध्ये सहमती होऊ शकली नाही. त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी १४४ जागांची मागणी केली आहे. ‘शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटू शकते,’ असे रावते म्हणाले. त्यांच्या या विधानाचं खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. ‘अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष फिफ्टी-फिफ्टी जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्यामुळे रावते जे बोलले त्यात काहीच गैर नाही,’ असे राऊत म्हणाले. निवडणुका सोबतच लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.