शिवसेनेला भाजपसोबत घेऊन विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकू – चंद्रकांत पाटील

0
850

पुणे, दि. १३ (पीसीबी) – काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढल्यावर विधानसभेच्या सध्या त्यांच्या असलेल्या ८० जागापैकी ४० जागा कमी होतील. याची त्यांना भीती वाटत आहे, त्यामुळे त्यांनी अफवा पसरविण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप राज्याचे महसूल मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. शिवसेनेला भाजपसोबत घेऊन आगामी  विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकू, असाही विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. 

खडकवासला मतदारसंघातील रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, आमदार बाळा भेगडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप – शिवसेनेच्या सरकारने  राज्यात प्रचंड  विकासकामे केली आहेत. तसेच रस्त्याच्या कामांचा वेग पाहून दोन्ही काँग्रेसला भीती वाटू लागली आहे. आघाडी सरकारने रस्त्यांच्या कामांना मोठ्या प्रमाणात निधी दिला नव्हता. त्यामुळे मागील १५ वर्षात  रस्त्यांची कामे चांगली झाली नाहीत, परिणामी रस्त्यावर खड्डे पडले  आहेत. त्यातच तुम्ही सेल्फी काढत आहात, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

राष्ट्रीय महामार्गावरून मिळणाऱ्या टोलमधून राज्यातील राष्ट्रीय महामार्ग केले जात आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसीचे रस्ते  मोटारीसाठी यापूर्वीच टोलमुक्त केले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जीएसटीमधून ४३ हजार कोटी,  महसूल विभागाच्या स्टॅम्प ड्युटी मधून २१ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यातून २६ हजार कोटी मिळाले आहेत. म्हणजे ५ हजार कोटी रुपयांनी निधी वाढला आहे, असे पाटील यांनी सांगितले.