‘शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा भाजपाचा दुर्योधनी कावा’; शिवसेनेचा भाजपावर निशाणा

0
500

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – तीन आठवड्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्याने अखेर मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सरकार स्थापनेचे निकष कठोर झाले असून आता कोणत्याही राजकीय पक्षाला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी गैरहजर राहून सत्ताधारी पक्षांना मदत करण्याच्या सोयीचा मार्ग बंद झाला आहे. आता किमान १४५ आमदारांचा पाठिंबा असल्याखेरीज राज्यपाल कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापनेची संधी देणार नाहीत. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्यास काँग्रेसला उघड पाठिंबा देणे भाग पडणार आहे. अशातच पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

राज्यातील जनतेने जो जनादेश दिला तो दोघांना दिला आहे. मात्र ते मानायला तयार नव्हते म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्हाला स्वतंत्र पावले उचलावी लागली. ठरल्याप्रमाणे भाजप शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थरास गेली नसती. शिवसेनेस जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकडय़ांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला.

भाजपाने महाराष्ट्राच्या बाबतीत तत्त्वे आणि संस्कार पाळायला हवे होते. निवडणुकीपूर्वी ठरल्याप्रमाणं भाजपा वागला असता तर आज परिस्थिती या थराला गेली नसती. आम्ही विरोधी पक्षात बसलो तरी चालेल पण शिवसेनेला जे ठरलंय ते द्यायचे नाही. भले आम्ही विरोधी बाकडय़ांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर टीकेचा बाण सोडला आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला. यावेळी भाजपाने काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती आणि बिहारमध्ये नितीश कुमारांना दिलेल्या पाठिंब्याचाही उल्लेख केला आहे.