शिवसेनेला कीक मारूनच सत्तेतून बाहेर काढावे लागेल – नारायण राणे

0
765

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नसते, त्यांना कीक मारूनच सत्तेतून बाहेर काढावे लागेल,  असा निशाणा  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी  शिवसेनेवर साधला . आज (मंगळवार) एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणे बोलत होते.  

शिवसेनेला डिवचण्यासाठी निवडले असेल तर जोरात डिवचले गेले पाहिजे. शिवसेनेसारख्या पक्षाला याचा काहीही फरक पडत नाही, असेही  ते यावेळी म्हणाले.  भाजप आणि शिवसेना यांची युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लढेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाकरे सिनेमा आपण घरीच पहाणार  आहे. माझ्या घरीच थिएटर असल्याने  तो घरीच पहाणार असल्याचे राणेंनी  सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला २०० जागा मिळतील, असा अंदाज राणेंनी व्यक्त केला.  सरकार बहुमतात येईल की नाही हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. माझ्या मुलाने ज्या भाषेत शिवसेनेला उत्तर दिले ते चुकीचे नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले. त्यामुळे माझ्या मुलाला राग येणे साहजिकच आहे. शेवटी तो राणेंचा मुलगा आहे, असे राणे यांनी नीलेश राणेंच्या विधानाचे समर्थन केले.