Pimpri

शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे- एकनाथ शिंदे यांची प्रमुख मागणी

By PCB Author

June 21, 2022

 पिंपरी दि. २१ (पीसीबी) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर आता शरद पवार हे रिंगणात उतरले आहेत. ठाकरे सरकार स्थापनेच्या वेळेपासूनचे हे तिसरे बंड असल्याचे पवार यांनी सांगितले. सरकार स्थापनेच्या वेळी देखील हरियाणात काही आमदार ठेवण्यात आले होते, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

सरकार स्थिर असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. शिंदे यांचे बंड शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. उद्धव ठाकरे हे यातून मार्ग काढतील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बदल करण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांत पवार यांनी निर्वाळा दिला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा आहे, हे मला नव्यानेच कळत आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे. कोणाला कोणत्या पदावर ठेवायचे, हा ठाकरे यांचा निर्णय असेल. त्याला आम्ही सहमत असू असाही निर्वाळा पवार यांनी दिला. शिवसेनेला एकनाथ शिंदेंशी चर्चा करू द्या, त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू, असेही पवार यांनी सांगितले.

दरम्यान, नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव घेऊन शिवसेना नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी दादा भुसे, संजय राठोड, संजय बांगर यांनी संपर्क साधला असून, त्यांनी तीन मागण्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकनाथ शिंदे यांच्यांशी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे यांनी संपर्क साधला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी एकनाथ शिंदे यांची आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत, तर उपमुख्यमंत्री आपली वर्णी लागावी, अशी मागणीही शिंदे यांनी केल्याचे समजते.