शिवसेनेत खरी हिंमत असेल तर स्वबळावर एखादी निवडणूक राज्यात लढवून दाखवावी

0
361

सोलापूर, दि.१३ (पीसीबी) – चंद्रकांत पाटील बुधवारी दुपारी एका खासगी कार्यक्रमासाठी सोलापूरात आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

पाटिल म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमत मिळविल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आनंद व्यक्त करणे म्हणजे शेजारच्या घरात मुलगा जन्माला आला म्हणून आपण स्वत: पेढे वाटण्यासारखे आहे, अशी उपरोधिक टीका करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, शिवसेनेत खरी हिंमत असेल तर स्वबळावर एखादी निवडणूक राज्यात लढवून दाखवावी, असे आव्हानही दिले. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीचे सरकार सत्तेवर असले तरी या तिन्ही पक्षात अजिबात ताळमेळ नाही.  राज्यात कायदा व सुव्यवस्थेची घडी विस्कटत चालली आहे अशी टीका पाटील यांनी केली.

राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वरचेवर वाढत चालले असताना मुंबईत एका कुटुंबाला वाटते म्हणून ‘नाईट लाईफ’ची संकल्पना कृतीत येत आहे. परंतु ‘नाईट लाईफ’मुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून जाण्याचा धोका संभवतो, असेही मत पाटील यांनी व्यक्त केले. केवळ एका कुटुंबाला वाटते म्हणून मुख्यमंत्री, एका कुटुंबाला वाटते म्हणून मंत्री आणि एका कुटुंबाला वाटते म्हणून ‘नाईट लाईफ’? एका कुटुंबाच्या इच्छेखातर हे सारे घडत असताना पोलिसांवरील ताण वाढत आहे. त्याचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.