शिवसेनेच्या वर्धापनदिनी युवा सेनेतर्फे भिक्षेक-यांची आरोग्य तपासणी

0
240

पुढील उपचाराचा खर्च युवा सेना उचलणार; युवा अधिकारी विश्वजित बारणे यांची माहिती

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त युवा सेनेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर युवा अधिकारी विश्वजित बारणे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील भिक्षेक-यांची त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण ६० जणांची तपासणी केली असून त्यांना दुर्धर आजाराचे निदान झाल्यास त्यांच्या पुढील वैद्यकीय उपचाराचा सर्व खर्च युवा सेना करणार असल्याचे बारणे यांनी सांगितले. तसेच भिक्षेक-यांना अन्नधान्याचेही वाटप करण्यात आले.

शिवसेनेचा आज ५५ वर्धापनदिन दिन आहे. त्यानिमित्ताने युवा सेनेतर्फे आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. कोरोना कालावधीत भिक्षेक-यांच्या आरोग्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. या महामारीच्या कालावधीत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिंपरी स्टेशन येथे मोठ्या संख्येने भिक्षेकरी, निराधार नागरिक बसतात. युवा सेनेच्या माध्यमातून तिथे जागेवर जाऊन ६० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या वेळी युवा सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर समन्वयक रूपेश कदम, चिंचवड विधानसभा युवासेना अधिकारी माऊली जगताप, उपविधानसभा युवासेना अधिकारी संग्राम धायरीकर, युवासेना पदाधिकारी विक्रम झेंडे, मंदार यळवंडे, सुरज बारणे, अक्षय परदेशी, आकाश जाधव उपस्थित होते.

लोकमान्य हॉस्पिटलच्या सहकार्याने ही आरोग्य तपासणी केली. डॉ. अभिषेक श्रीखंडे आणि त्यांच्या टीमने भिक्षेकरुंची तपासणी केली. या तपासणीत दुर्धर आजाराचे निदान झालेल्यांचा पुढील उपचाराचा सर्व खर्च युवा सेना करणार असल्याची घोषणा युवा अधिकारी विश्वजित बारणे यांनी केली. कोरोना काळात असा उपक्रम कोणीच राबविला नाही. तसेच या नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

युवा अधिकारी विश्वजित बारणे म्हणाले, “कोरोना कालावधीत सर्वच घटकांतील नागरिक अडचणीत आहेत. शहरातील विविध पुलाखाली राहणारे भिक्षेकरी, निराधारांच्या आरोग्य, उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. लोकमान्य हॉस्पिटलच्या सहकार्याने भिक्षेकरी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत दुर्धर आजाराचे निदान झाल्यास, त्यासाठी येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च युवा सेना करणार आहे. त्याचबरोबर या नागरिकांना अन्नधान्याचे देखील वाटप करण्यात आले”.