शिवसेनेच्या महिला संघटकपदावरून सुलभा उबाळे यांची उचलबांगडी; आकुर्डीतील उर्मिला काळभोर नव्या महिला संघटक

0
2577

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या, भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा आमदारकी लढलेल्या आणि तीन टर्म नगरसेविका असलेल्या सुलभा उबाळे यांची शहर शिवसेनेच्या महिला संघटकपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अॅड. उर्मिला काळभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुलभा उबाळे यांना सेटलमेंटचे राजकारण आणि पक्षातील सक्षम कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे राजकारण भोवल्याचे मानले जात आहे. महिला शहर संघटकपदावरून झालेल्या उचलबांगडीमुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता त्या कोणती राजकीय भूमिका घेतात की शांत राहून संधी मिळण्याची वाट पाहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पिंपरी-चिंचवडच्या संघटनेत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सर्वात आधी संपर्कप्रमुख अमोल कोल्हे यांना हाकलले. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्याकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर शहरप्रमुख राहुल कलाटे यांना केवळ महापालिकेतील गटनेतपदावर ठेवले. त्यांच्या जागी योगेश बाबर यांची निवड करण्यात आली. आता सुलभा उबाळे यांची शहर महिला संघटकपदावरून पक्षाने उचलबांगडी करून पक्षात संस्थानिक बनलेल्या पदाधिकाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उबाळे यांची उचलबांगडी करून शहर शिवसेनेच्या महिला संघटकपदी आकुर्डीतील अॅड. उर्मिला काळभोर यांची निवड करण्यात आली आहे. सुलभा उबाळे या शिवसेनेच्या तीन टर्म नगरसेविका होत्या. त्यांनी २०१२ ते २०१७ या कालावधीत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेतेपद भूषविले आहे. अत्यंत आक्रमक आणि भाषण कौशल्य असणाऱ्या महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. आजमितीला शिवसेनेत त्यांच्यासारखी आक्रमक महिला शिवसेनेत शोधूनही सापडणार नाही. त्यामुळेच महिला संघटकपदावरून त्यांची झालेली उचलबांगडी अनेकांना राजकीय धक्का देणारी आहे.

सुलभा उबाळे यांनी सलग दोनवेळा भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर आमदारकीची निवडणूक लढविली आहे. परंतु, दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतःचे नेतृत्व रेटण्याचा प्रयत्न उबाळे यांना महागात पडला. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर त्यांच्याकडे शहर महिला संघटकपदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, आता या पदावरूनही त्यांची उचलबांगडी झाली आहे. सेटलमेंटचे राजकारण आणि पक्षातील सक्षम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे राजकारण त्यांना भोवल्याचे मानले जात आहे.