शिवसेनेच्या दोन्ही खासदारांमध्ये बेबनाव, पक्षाचा एकमेव आमदार असून नसल्यासारखा; पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांची खंत

0
2596

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार श्रीरंग बारणे हे दोघेही आपल्याच पक्षाचे असूनही त्यांच्यात तीव्र मतभेद आहेत. दोघेही पक्षासाठी एकदिलाने काम करत नाहीत. त्याची किंमत शिवसैनिकांना मोजावी लागत आहे. पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार हे शिवसेनेचे असून नसल्यासारखेच आहेत. शहरातील एकमेव आमदारांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन काम करणे अपेक्षित आहे. परंतु, आपल्या पक्षाच्या आमदारांनी गेल्या साडेचार वर्षांत पक्षासाठी कोणतेच काम केले नसल्याची खंत पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांनी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यापुढे मांडली आहे.

दोन दिवसांपूर्वी खासदार राऊत यांनी मावळ, पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी या मतदारसंघांमधील सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला. चारही मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आदी बैठकीला उपस्थित होते. परंतु, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीकडे पाठ फिरवली. भोसरीमध्ये असूनही त्यांनी या आढावा बैठकीला जाणे टाळले.

गेल्यावेळी खासदार राऊत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यात खडाजंगी झाली होती. लांडे यांनी खासदार आढळराव पाटील यांच्या कारभाराचा पाढा वाचला होता. त्यामुळे आढळराव पाटील चांगलेच संपापले होते. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच जुंपली. दोघेही अक्षरशः एकेरी भाषेवर आले होते. परिणामी भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे खासदार आढळराव पाटील यांच्याविषयी चांगले मत नसल्याचे समोर आले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे पुन्हा घडायला नको आणि मतदारांमध्ये चुकीचा संदेश जायला नको, यासाठी आढळराव पाटील यांनी खासदार राऊत यांनी दुसऱ्यांदा घेतलेल्या आढावा बैठकीला दांडी मारल्याची चर्चा आहे.

खासदार राऊत यांनी चारही विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या स्थितीबाबत अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व खासदार श्रीरंग बारणे यांच्यात असलेल्या राजकीय बेबनावावर पदाधिकाऱ्यांनी बोट ठेवले. दोन्ही खासदारांमध्ये तीव्र मतभेद आहेत. त्याचा फटका शिवसेनेला बसत आहे. या दोघांच्यात काहीच राजकीय ताळमेळ नाही. दुसरीकडे शहरातील पक्षाचे एकमेव आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार हे शिवसेनेचे असून नसल्यासारखेच आहेत.

आमदार चाबुकस्वार यांनी आजपर्यंत पक्षासाठी एकही काम केले नाही. शिवसैनिकांना सोबत घेऊन काम करणे तर दूरच ते कोणाला विचारत सुद्धा नाहीत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर पक्षाला पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भविष्य राहणार आहे का?, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी खुद्द संजय राऊत यांनाच केला. सर्व पदाधिकाऱ्यांच्या या तीव्र भावना ऐकून घेतल्यानंतर खासदार राऊत यांनी आगामी निवडणुकांच्या कामाला सुरूवात करण्याचे आदेश दिले. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीनही विधानसभा मतदारसंघांच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कोणीही असले, तरी भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी जिवाचे रान करावे, असे आदेश त्यांनी दिले.