शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणामुळे कातेंवर जीवघेणा हल्ला; नवाब मलिक यांचा आरोप

0
545

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावरील हल्ल्यावरुन आता राजकारण तापू लागले आहे. कारण कातेंवरील हल्ला हा ठेकेदारीतून झाला असून त्यामागे शिवसेनेतले अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

गृहखातं मुख्यमंत्र्यांच्या हातात असतानाही मुंबईत गँगवार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झालाय का, असा सवालही त्यांनी केला. शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर रात्री जीवघेणा हल्ला झाला. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यातून आमदार तुकाराम काते थोडक्यात बचावले आहेत. हल्ल्यात तुकाराम कातेंच्या सुरक्षारक्षकासह २ कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र नगर भागात मेट्रो कारशेड तयार करण्याचे काम रात्रंदिवस सुरु असल्याने याचा तेथील स्थानिकांना त्रास होत आहे. हे काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले होते. काल (शुक्रवारी) रात्री महाराष्ट्र नगरमधील देवीच्या मंडपात बसले असता, त्यांच्यावर ५ ते ६ जणांनी जीवघेणा हल्ला केला. मेट्रोच्या कंत्राटदाराने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप तुकाराम कातेंनी केला.