मुंबई, दि. २३ (पीसीबी ) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अयोध्येच्या दौऱ्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, शिवसेनेचे देव तर बाळासाहेब ठाकरे आहेत, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी आधी बाळासाहेबांच्या स्मारकाकडे लक्ष दिले पाहिजे, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. विकासाचा मुद्दा अंगलट आल्याने राम मंदिराचा मुद्दा घेतला आहे, अशीही टीका त्यांनी केली . राम मंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर राजकारण करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. याचा अर्थ तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचा असा होतो, असे भुजबळ म्हणाले.
राम मंदिर बांधणे शक्य वाटत होते, तर गेल्या चार वर्षात ते का बांधण्यात आले नाही असाही सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. त्यामुळे या मुद्द्यावर शिवसेनेला डबल ढोलकी वाजवता येणार नाही. सत्तेत राहून विरोधकांची जागा घेता येणार नाही. सत्तेतून बाहेर पडून खुल्या मैदानात या, असेही आवाहन भुजबळ यांनी शिवसेनेला दिले .