शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह ११ जणांवर गुन्हा नोंद

0
474

उस्मानाबाद,दि.३१(पीसीबी) – सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलिसात शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह ११ जणांवर कलम ३०७ प्रमाणे हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खासदार ओमराजे, त्यांचे नातेवाईक हिंमत पाटील, रवी पाटील यांच्यासह अन्य ८ अनोळखी आरोपींचा समावेश आहे. यानंतर खासदार ओमराजे त्यांचे नातेवाईक हिंमत पाटील यांच्यासह ४ आरोपी पसार झाले आहेत.

तुळजापूरचे भाजप आमदार राणा पाटील यांच्यासह इतरांवर काल (३० डिसेंबर) हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. आज खासदार ओमराजेवर गुन्हा नोंद झाला आहे. कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक यांनी दिल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सतीश दंडनाईक हे भाजप आमदार राणा पाटील यांचे समर्थक आहेत.दंडनाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ डिसेंबर रोजी ते स्वतः, गणेश भातलवंडे व गाडी चालक पोपट चव्हाण हे मिळून रात्री ८.३० वाजता अकलूज येथे गेलो. कळंब पंचायत समिती सदस्य हिंमतराव पाटील यांच्या घरी असल्याची खात्री करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ३ पंचायत समिती सदस्य देण्याची विनंती केली. हे सदस्य स्वखुशीने आले की बळजबरीने याची खात्री करायची असे सांगितल्यावर हिंमतराव पाटील यांनी माझ्यावर हल्ला केला.त्यानंतर जीव वाचविण्यासाठी मी पळालो असता माझा १ किमी पाठलाग करून मला पकडले. त्यानंतर घरात आणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हिंमतराव पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन लावला आणि सांगितले की मी यांना पकडले आहे.

ओमराजे फोनवर म्हणाले की त्यांना सोडू नका त्यांना धडा शिकवा असे मी फोन स्पीकरवर असताना ऐकले. त्यानंतर पाटील यांनी सत्ततूर डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला व भातलवंडे आणि चव्हाण यांनाही पकडून मारहाण केली. हिंमतराव पाटील यांनी त्यानंतर आम्हाला अकलूज पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी माझ्या पायाला व हाताला मुक्कामार लागला आहे. मी घाबरल्याने फिर्याद दिली नव्हती मात्र माजी मानसिक स्थिती ठीक झाल्याने व भीती कमी झाल्याने अटकेत असताना तक्रार देत आहे .