शिवसेनेची यंदाच्या दसरा मेळाव्यातील शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी

0
572

मुंबई, दि, २७ (पीसीबी) – शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा लोकसभा निवडणुकांच्या आधीचा दसरा मेळावा असल्याने या मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यात शक्तिप्रदर्शनसाठी आवश्यक असलेलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

गणेशोत्सवानंतर शिवसेने दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरूवात केली असून, या मेळाव्याच्या नियोजनासाठी शिवसेना भवन येथे शिवसेना नेते सुभाष देसाई, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, रघुनाथ कुचिक आदींच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडणाऱ्या या दसरा मेळाव्यात भाजपला आपली ताकद दाखविण्याचा जोरदार प्रयत्न शिवसेनेकडून होणार असल्याचे कळते. एरव्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिकांमुळे शिवाजी पार्कचे अख्खे मैदान व्यापून जाते. त्यामुळे या मैदानात ओढूनताणून गर्दी जमविण्याची वेळ शिवसेनेवर येत नाही.

मात्र, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत युती करताना भाजपकडून नेमक्या किती जागा मिळणार याचा अंदाज शिवसेना नेतृत्वाला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत १५० जागांपेक्षा एकही कमी जागा घेण्यास शिवसेना नेतृत्व तयार नसल्याने युती तुटली होती. मात्र, आता भाजपचे नेतृत्वच शिवसेनेसोबत युती करण्यासाठी उत्सुक आहे.