शिवसेनेचा पिकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा म्हणजे नौटंकी – राजू शेट्टी

0
397

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने पिकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला आहे. पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करत शिवसेनेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही शिवसेनेची नौटंकी असल्याची टीका केली आहे.

राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, “शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून विमा कंपन्यासोबत करार केला आहे. अधिकाऱ्यांनी अहवाल तयार केले तेव्हा शिवसेना झोपा काढत होती का ?”. मी दोन वर्षांपुर्वी मुख्यमंत्र्यांना पुरावे दिले होते अशी माहिती यावेळी राजू शेट्टी यांनी दिली.

याआधीही राजू शेट्टी यांनी टीका करताना एकीकडे सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो ही नाटक करायची. शिवसेनेचा हा दुटप्पीपणा संपूर्ण महाराष्ट्राला समजलेला आहे असे म्हटले होते.

उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा करताना सगळ्या कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांनी लावली पाहिजेच अशी मागणी केली होती. काही ठिकाणी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले गेले मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी ही मागणी आम्ही केली आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्याच पाहिजेत. झारीतले शुक्राचार्य कुणी असतील तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. शेतकऱ्यांना जर कुणी नाडले तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.