Maharashtra

शिवसेना सोबत आली तर ठीक, नाही तर आपण समर्थ आहोत – मुख्यमंत्री फडणवीस

By PCB Author

December 20, 2018

मुंबई, दि. २० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप युती होण्याची खात्री भाजपाध्यक्ष  अमित शहा यांनी व्यक्त केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत परस्परविरोधी विधान केले आहे. शिवसेना सोबत आली तर ठीक, नाही तर आपण समर्थ आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी म्हटल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना–भाजप यांची युती होण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपच्या नेत्यांकडून सतत युती होण्याबाबत सकारात्मक विधाने केली जात आहेत. तर शिवसेनेने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे युती होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्वबळाची भाषा करणारी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहणार, की आपली ‘एकला चलो रे’ची तलवार म्यान करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार  आहे.

अमित शहांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होण्याची खात्री व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र अचानक युतीसंदर्भातील आपली भाषा बदलल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, युतीबाबत पडद्यामागून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते. भाजपने शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर शिवसेनेने भाजपसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे युती होणार का नाही, याची वाट पाहावी लागणार आहे.